Ladki Bahin Yojana Video : लाडकी बहीण योजना बंद होणार? महायुती सरकारमधील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं चर्चा - Marathi News | Eknath shinde shiv sena leader Ramdas Kadam big statement on ladki bahin yojana
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात येत्या १२ मार्चपर्यंत सलग दोन महिन्याचे म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा होणार असल्याची माहिती राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. महिला दिनाचे औचित्य साधत फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता लाडक्या बहिणींना पाठवण्यास सुरूवात झाल्याचेही पाहायला मिळत असताना महायुती सरकारमधील एका बड्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे. ‘लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरू करता येतील’, असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलं आहे. इतकंच नाहीतर बजेट डोळ्यासमोर ठेऊन सगळ्या योजना चालू कराव्या लागतात. अंथरुन पाहूनच पाय पसरावे लागतात. आज आपण लाडकी बहीण योजनेचे बजेट पाहिलं, तर तीस हजार कोटींपेक्षा जास्त आहे. या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर ठेऊन आपल्याला विकासाची वाटचाल करावी लागते, असही रामदास कदम म्हणाले. नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याच्या या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधकांकडून टीका होत असताना सरकारमधील नेत्यानंच असं वक्तव्य केल्यानं चर्चा सुरू झाल्या आहेत.