Ratnagiri: वैष्णवी माने हिच्या मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल, गरबा नृत्य कार्यक्रमात चक्कर येऊन झाला होता मृत्यू - Marathi News | A case has been registered against the principal in connection with the death of a female student due to dizziness while performing in a garba dance program at school
राजापूर : तालुक्यातील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पाचल संचालित सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात नवरात्रोत्सवा दरम्यान प्रशालेत गरबा नृत्य कार्यक्रमात खेळताना चक्कर येऊन पडल्याने आजिवली – मानेवाडी येथील वैष्णवी माने हिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी देसाई यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडील प्रकाश लक्ष्मण माने यांनी राजापूर पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल केला आहे. वैष्णवी प्रकाश माने ही पाचल येथील सरस्वती विद्यामंदिर या प्रशालेत इयत्ता अकरावी मध्ये शिकत होती. नवरात्रोत्सवात दिनांक १० ऑक्टोबर २०२४ रोजी सरस्वती पूजनाच्या निमित्ताने शाळेत गरबा नृत्य खेळत असताना चक्कर येऊन पडल्याने वैष्णवी हिचा मृत्यू झाला होता. दरम्यान गरबा नृत्याचा कार्यक्रम दुपारी दोन वाजता कडक उन्हामध्ये प्रशालेच्या उघड्या मैदानात खेळण्यात आला होता. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय देखील नव्हती. तसेच यावेळी मोठ्या आवाजाचा डीजे लावण्यात आला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्याध्यापक तसेच शिक्षक यापैकी कोणीही उपस्थित नव्हते.
वैष्णवी ही खेळताना मैदानात खाली कोसळली त्यावेळी तिच्या मैत्रिणींनी आरडा ओरडा करून गाडी आणा व वैष्णवीला हॉस्पिटलला न्या असे सांगितले, मात्र ती जवळपास दहा मिनिटे मैदानावर उन्हात पडून होती. शाळेच्या शेजारीच डॉक्टर आहेत तसेच पाचलमध्ये देखील खासगी डॉक्टर आहेत परंतु तिला उचलून शाळेच्या हॉलमध्ये नेले गेले. तेथून सुमारे ३० ते ३० मिनिटे तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस मुख्याध्यापक तानाजी देसाई यांनी तिला चक्कर आली आहे ती थोड्यावेळाने बरी होईल असे सांगून दुर्लक्ष केले.
सुमारे ४० मिनिटानंतर तिला शिक्षकांच्या गाडीतून ग्रामीण रुग्णालयात नेले. रुग्णालयात नेल्यावर सुद्धा डॉक्टर दहा ते पंधरा मिनिटे रुग्णालयात उशिराने आले तिचा श्वास गुदमरल्याने तिला तात्काळ ऑक्सिजनची गरज असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करायचे सोडून १०८ नंबर फोन केला असे सांगून दिरंगाई केली.
मुख्याध्यापकांच्या कुचराईमुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याचे वडील प्रकाश लक्ष्मण माने यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.त्यानुसार राजापूर पोलिसांनी मुख्याध्यापक तानाजी देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, याबाबतचा पुढील तपास राजापूर पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे करीत आहे.