Prajakta Mali | 'देवाच्या दारात कुणी सेलिब्रिटी नसतो..'त्र्यंबकेश्वर' मधील नृत्य वादावरून प्राजक्ता काय म्हणाली?
माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी मंदिर प्रांगणात सेलिब्रेटींचे कार्यक्रम करण्याचा पायंडा नको म्हणत या कार्यक्रमाला आक्षेप नोंदवणारे पत्र नाशिक ग्रामीण पोलिसांना दिले. तसेच पुरातत्त्व विभागाने या कार्यक्रमाला आक्षेप घेणारे पत्र देत केंद्रीय कार्यालयाकडून परवानगी घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. परंतु पूर्वनियोजित हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे देवस्थानने जाहीर केले आहे.
१२ ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे. यानिमित्त लाखो भाविक त्र्यंबकराजाचे दर्शन घेत आहेत. अशातच त्र्यंबकेश्वर देवस्थानने मराठी अभिनेत्री तथा नृत्यांगणा प्राजक्ता माळी हिचा सांस्कृतिक नृत्याविष्काराचा ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ हा कार्यक्रम मंदिराच्या प्रांगणात बुधवारी (दि. २६) आयोजित केला आहे. कार्यक्रमाला लाखो लोकांनी उपस्थिती लावल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्य पुरातत्त्व विभागाने विरोध दर्शवित पत्र लिहून कार्यक्रम घेण्यास विरोध दर्शविला आहे. प्राचीन स्मारक आणि पुरातत्त्वीय स्थळ, अवशेष अधिनियम १९५८ या कायद्यानुसार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यावर अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर मंडल, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग यांनी आक्षेप घेतला आहे. कार्यक्रमापूर्वी दिल्लीच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयाची परवानगी घेण्याचे आदेश पुरातत्त्व विभागाने दिले आहेत.
पण देवस्थानाच्या विश्वस्तांनी सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होतील. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असा ठाम निर्णय घेतला आहे.