Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार का? अर्थसंकल्पातून अखेर सरकारची भूमिका स्पष्ट | Maharashtra Budget 2025 ajit pawar on Ladki Bahin Yojana 2100 rupees installment
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. निवडवणुकीत दिलेल्या आश्वासने अर्थसंल्पात पूर्ण होणार का? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम १५०० रुपयांवरुन २१०० रुपयांचं आश्वासन दिलं होतं. या संदर्भात अर्थसंकल्पातून सरकारची भूमिका समोर आली आहे.
लाडक्या बहिणींचा हप्ता १५०० रुपयेच राहणार?
राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३६ लाख कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. मात्र, मासिक हप्ता १५०० रुपये इतकाच राहणार असल्याचे अखेर स्पष्ट झालं आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी २१०० रुपये हप्ता करण्याविषयी कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही. अर्थसंकल्पापूर्वी, तसे संकेत भाजप नेत्यांनी दिले होते. भाजप नेते विधानपरिषद आमदार प्रविण दरेकर यांनी राज्याची आर्थिक घडी नीट करण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार आहे. पुढील २०-२५ वर्षांचं आर्थिक नियोजन या अर्थसंकल्पातून झालेलं दिसेल. लाडक्या बहिणींसारख्या हजारो कोटींच्या योजना गरिबांसाठी आहेत. त्यामुळं निश्चितचं अर्थव्यवस्थेवर ताण आहे, हे मान्य असल्याचं प्रविण दरेकर म्हणाले होते.
लाडक्या बहिणींना देणार एआयचं प्रशिक्षण
लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. टेक कंपनी मायक्रोसॉफ्टशी राज्य सरकार करार करणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून हजारो महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. राज्यातील महिलांचे सबलीकरण करण्यासाठी कौशल्य विकासावर भर देणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.