Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये'; एकनाथ शिंदेंकडून योजनेबाबत सर्वात मोठी बातमी - Marathi News | Ladki Bahin Yojana Women beneficiaries likely to get Rs 2100 soon
ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेला सुरुवात झाली. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत एकूण नऊ हाप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. मार्च महिन्याचा हाप्ता देखील लाभार्थी महिलांना मिळाला आहे.
दरम्यान या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण वाढल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात सुरू असलेल्या इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यातच या योजनेच्या निकषात बसत नसलेल्या अनेक महिलांना सरकारने या योजनेतून वगळल्यामुळे या योजनेबाबत चर्चेला उधाण आलं आहे. मात्र ही योजना सुरूच राहणार असून, पात्र लाभार्थी महिलांना लाभ मिळत राहील असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी जर राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण या योजनेंतर्गत मिळणाऱ्या हाफ्त्यामध्ये वाढ करू, लाभार्थी महिलांना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अर्थसंकल्पामध्ये यासंदर्भात घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे.
याबाबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. लाडकी बहीण योजना सुरू आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळत आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये देऊ असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. राज्याची अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल, लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रूपये देवू, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.