Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? नववर्षात नवी अपडेट आली समोर

When will get April month installment of Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये देण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. उलट योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी होत असून निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात येत आहे.
सरसकट महिलांना लाभ न देता निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात येत आहे. तसेच योजनेची रक्कम वाढवण्यात आलेली नसल्याने विरोधकांनी ही योजना लवकरच बंद होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम आहे. आता एप्रिल महिना उजाडला असून या महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात आहे. याच एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत नवी अपडेट समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण नऊ हप्त्यांचे एकूण 13,500 रुपये (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च) लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता 10वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे. पण एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. पण आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.
एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून देण्यात आला होता. एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, या महिन्याचा हप्ता उशिरा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कारण काय?
लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार, अर्ज केलेल्या महिलेकडे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपर्यंत असणे अनिवार्य) असणे आवश्यक आहे. मात्र, काही महिलांचे उत्पन्न यापेक्षा अधिक असतानाही योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे अर्जांची छाननी करण्यात येत आहे. महिलांच्या उत्पन्नाची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभागाकडे राज्य सरकारने माहिती मागितली होती. मात्र, आयकर विभागाने ही माहिती अद्याप दिली नाहीये. परिणामी अर्जांची छाननी अद्याप पूर्ण झालेली नाहीये. यामुळे एप्रिल महिन्याच्या हप्त्याला उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.