Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या पैशावर पतीचा डल्ला; जाब विचारणाऱ्या पत्नीवर कोयत्याचा वार




सोलापूर : Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरली आणि महायुतीला बहुमत मिळवून देण्यात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा राहिला. यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते सुखावले आहेत. पण आता या योजनेची छाननी सुरू झाली असून, चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिलांना योजनेतून वगळलं जात आहे. आतापर्यंत 9 लाखांहून अधिक महिलांना वेगवेगळ्या कारणांमुळे अपात्र ठरवलं गेलं आहे. ही योजना महिलांना आर्थिक आधार देत असल्याने तिची प्रशंसा होत असली, तरी काही दारुडे पती आपल्या पत्नींकडून या योजनेचे पैसे हिसकावून घेत असल्याचं दिसत आहे. यातून घरगुती वादविवादही वाढत आहेत. असाच एक प्रकार सोलापूरच्या माढा तालुक्यात उघडकीस आला असून, याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

माढा तालुक्यातील लोणी गावात एका महिलेने तिच्या बँक खात्यात ‘लाडकी बहीण’ योजनेतून आलेले पैसे पतीने परस्पर काढून दारूवर उडवल्याचा आरोप केला आहे. या पैशांबाबत विचारणा केल्यावर संतापलेल्या पतीने पत्नीवर कोयत्याने हल्ला केला. या धक्कादायक घटनेनंतर पत्नीच्या तक्रारीवरून पती आणि सासूवर कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण योजना’ बंद होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. “आम्हाला या योजनेबद्दल आपुलकी आहे. काहींची परिस्थिती चांगली असूनही ते योजनेचा लाभ घेत आहेत, हे योग्य नाही. पण आम्ही ही योजना बंद न करता त्यात सुधारणा करणार आहोत,” असं त्यांनी सांगितलं. योजनेचं वयोमर्यादा 60 वरून 65 करण्याचा निर्णय घेतला असून, पाच वर्षांचा वचननामा पूर्ण करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. “काहींनी याला निवडणुकीचा जुमला म्हणून कोर्टात आव्हान दिलं होतं, पण आम्ही दोन शासन निर्णय काढून ही योजना राबवत आहोत,” असंही त्यांनी नमूद केलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:35 20-03-2025







Source link