Ladki Bahin Yojana : "लाडकी बहीण योजना कायम पण…"; अजित पवार यांचं विधानसभेत वक्तव्य
मुंबई : Ladki Bahin Yojana : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला गेल्या दोन आठवड्यांपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान राडा सुरू असून, अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. आज विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं. यासोबतच त्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’मध्ये बदल करण्याची घोषणा केली. ही योजना बंद होणार नाही, पण त्यात सुधारणा केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. योजनेअंतर्गत काही महिलांची नावं वगळली गेली असून, त्याबाबतही त्यांनी माहिती दिली. ( Ladki Bahin Yojana )
अजित पवार म्हणाले, “अर्थमंत्री म्हणून मी या योजनेचा राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विचार करतो. या योजनेद्वारे महिलांना दरमहा 1500 रुपये थेट मिळत आहेत, जे महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचं पाऊल आहे. मुंबई बँकेने या योजनेशी जोडलेल्या महिलांना 10 ते 25 हजारांपर्यंत कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे, असं दरेकरांनी सांगितलं.” ते पुढे म्हणाले, “ज्या महिलांना व्यवसाय सुरू करायचाय, त्यांच्यासाठी ही योजना कर्जाशी जोडून त्यांना प्रोत्साहन देऊ शकते. यामुळे ही योजना फक्त आर्थिक मदत राहणार नाही, तर महिलांच्या सक्षमीकरणात मोठी भूमिका बजावेल. वर्षाला सुमारे 45 हजार कोटी रुपये महिलांच्या हातात पडतील, ज्याचा फायदा त्यांच्या कुटुंबाला आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही होईल.” ( Ladki Bahin Yojana )
महसुली तुटीवरून झालेल्या चर्चेला उत्तर देताना पवार म्हणाले, “महसुली उत्पन्न कमी झाल्याने तूट वाढली, असं नाही. आकडेवारी पाहिली तर उत्पन्नात सातत्याने वाढ झाल्याचं दिसतं. जीएसटीमुळे करदात्यांची संख्या वाढली असून, पुढील काही वर्षांत आणखी वाढ होईल. 2024-25 मध्ये 3 लाख 28 हजार कोटी रुपये जीएसटी जमा झाला, जो मागील वर्षाच्या तुलनेत 12.3 टक्क्यांनी जास्त आहे. देशपातळीवरील जीएसटीत महाराष्ट्राचा वाटा 16.31 टक्क्यांवर पोहोचला आहे. यंदा 95.20% महसूल जमा झाला असून, 2025-26 मध्ये 100% महसूल जमा होईल, असा विश्वास आहे,” असं त्यांनी सांगितलं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:49 20-03-2025
