Ladki Bahin Yojana : आता 'त्या' लाडक्या बहिणींचा दारोदारी जाऊन घेणार शोध..

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीणच्या योजनेचा गैरवापर करून ज्यांनी पैसे घेतले, अशा तक्रारी ज्या भागांमधून आल्या त्या ठिकाणी फेर तपासणी केली जात होती.

मात्र आता सगळ्यांचीच फेरतपासणी केली जात आहे. तसेच अद्याप काही अर्जांची छाननी होण्याचं काम बाकी आहे. या अर्जांची छाननी देखील काटेकोर पद्धतीने करण्याचं काम जोरात सुरु झालं आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील महिला वर्गाला आर्थिक पाठबळ देण्याचं काम करण्यात आलं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिला वर्गाला याचा मोठा फायदा झाला आहे. मात्र, दुसरीकडे काही महिलांनी या योजनेचा चुकीचा फायदा घेतला असल्याचं सुद्धा समोर आलं आहे.

अनेक महिलांच्या नावे बनावट खाती उघडून चुकीच्या पद्धीतनं पैसे लाटण्यात आली आहे. हाच गैरप्रकार थांबवण्यासाठी म्हणून आता शासनानं काही कठोर नियमावली आखत योजनेतील लाभार्थी महिलांची पुनर्पडताळणी करण्यास सुरुवात केली.

कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण आता बंद होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, असं सुरुवातीपासून स्पष्ट करण्यात आलं होतं.

मात्र या निकषाकडे दुर्लक्ष करून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला. परिणामी, शासनानं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा आधार घेत चारचाकी वाहन असलेली यादी घेऊन लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या घरांचा आढावा घेण्याचं काम सुरू केलं.

लातूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 4398 महिलांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली. त्यात 2763 महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असल्याचं निदर्शनास आलं. ज्यामुळं आता ही नावं योजनेतील लाभार्थींच्या यादीतून वगळण्यात येणार आहेत.

या योजनेतून स्वत:हून माघार घेण्याचा पर्यायही शासनानं महिलांना दिला असून, अर्ज मागे घेण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे. परिणामी अर्ज मागे घेतला नसेल तर नंतर लाभार्थींच्या यादीतून नावे वगळण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष :

– लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे.

– दरवर्षी १ जून ते १ जुलै दरम्यान ई-केवायसी करणे अनिवार्य असणार.

– अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल.

– लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार.

– नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही

– अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार.

– अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र.

– ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेतून बाद केले जाईलन.

– दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना १५०० रुपये दिले जातील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:03 26-03-2025

Source link