पुण्यात नृत्य शिक्षकाकडून चिमुकल्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणी संस्थाचालकालाही अटक? कसा समोर आला प्रकार?

फोटो स्रोत, Getty Images

पुण्यातील एका शाळेमध्ये नृत्य शिक्षकाने मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या शिक्षकाची कोर्टाने 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी संस्थाचालकांना अटक केली आहे. संस्थाचालकांनी मुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या नसल्याने ते दोषी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

ज्युवेनाईल जस्टीस अॅक्टच्या कलम 75 अंतर्गत गुरुवारी संध्याकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशीनंतर संध्याकाळी संस्थाचालकांना अटक करण्यात आली.

2022 ते 2024 या दोन वर्षांमध्ये एकूण चार मुलांवर त्याने अत्याचार केल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात स्पष्ट झालं आहे. शाळेत मुलांना समुपदेशन केलं जात असताना हा प्रकार उघडकीला आला.

दरम्यान, संस्थाचालकांना अटक केल्यानंतर आता पालक आक्रमक झालेले दिसत आहेत. या प्रकरणात पालकांनी शाळेच्या आणि संस्थाचालकांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरु केले आहे. शाळेबाहेर जमत पालकांनी वी सपोर्ट स्कूल अशा स्वरुपाचे बोर्ड हातात घेत शाळेला पाठिंबा दिला.

प्रकरण काय?

पुण्यातल्या एका शाळेत सहावीच्या वर्गात समुपदेशक ‘गुड टच, बॅड टच’ बाबत विद्यार्थ्यांशी बोलत होते. यातच खेळ आणि चर्चा सुरु असताना लैंगिक अत्याचार म्हणजे काय याबाबत एका 11 वर्षांच्या विद्यार्थ्याने विचारणा केली.

त्याला याबाबत माहिती दिल्यानंतर असा प्रकार आपल्यासोबतही झाल्याचं त्याने सांगितलं. शाळेत शिकवणाऱ्या डान्स टिचरने आपल्याला ‘बॅड टच’ केल्याची माहिती त्याने दिली.

त्यानंतर या समुपदेशकांनी तातडीने शाळा प्रशासनाला याबाबत माहिती दिली. शाळेने पालकांशी चर्चा करत पोलिसांकडे याप्रकरणाची तक्रार दाखल केली. यानंतर या शिक्षकाला अटक करण्यात आली.

याबाबत चर्चा करण्यासाठी 18 जानेवारीला शाळा प्रशासनाने पालकांना शाळेत बोलावलं. यावेळी पालकांनी आक्रमक होत, शाळा बंद ठेवण्याची मागणी केली.

या दरम्यान प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, आणखी एका 10 वर्षांच्या मुलासोबतही असाच प्रकार घडल्याचं त्याने सांगितलं.

त्यापाठोपाठ याच शाळेत शिकणाऱ्या आणखी दोन मुलांनीही आपल्यावर असेच लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. या चारही प्रकरणांच्या अनुषंगाने आता वारजे स्थानकात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, “याच शाळेतील एकूण चार मुलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.यातील मुलं ही चौथीमध्ये आणि सहावीमध्ये शिकणारी आहेत.

शाळेत डान्स शिकवणाऱ्या टिचरने या मुलांवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही शाळेत जाऊन संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे.

याबाबत समुपदेशकाकडून शाळेला आणि त्यांच्याकडून आम्हांला माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही मुस्कान सेल आणि इतर प्रक्रियांमार्फत शहानिशा करुन गुन्हा दाखल केला आहे.”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नृत्य शिक्षक म्हणून शाळेत 2022 पासून कार्यरत होता.

हा शिक्षक शाळेच्या वेळांशिवाय काही ‘एक्स्ट्रा डान्स क्लास’ घेत होता. या क्लासच्या ब्रेक दरम्यान तो या मुलांसोबत असं कृत्य करत असल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे.

गेल्या दोन वर्षांपासून हे अत्याचार सुरू होते आणि आता आलेल्या तक्रारींपैकी काही मुलांवर नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान अत्याचार केले गेले आहेत.

शाळेत नोकरी देताना आवश्यक असलेले, ‘कॅरॅक्टर व्हेरीफिकेशन’ केलं होतं का याचा तपास आता पोलीस करत आहेत.

शाळेची भूमिका

या संपुर्ण प्रकरणाबाबत शाळेने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यात शाळा प्रशासनाने म्हणलं आहे, “आमच्या शाळेतल्या समुपदेशकांकडून 11 वर्षांच्या एका मुलाला नृत्य शिक्षकाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा प्रकार झाल्याचं सांगितल्याचं आम्हाला समजलं.

हा प्रकार कळल्याबरोबर समुपदेशकांनी तातडीने प्रशासनाला याबाबत माहिती दिली. शाळा प्रशासनाने तातडीने पोलिसांना आणि या विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत कळवलं. त्यानंतर या नृत्य शिक्षकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.

तपासादरम्यान याच शिक्षकाने आणखी एका 10 वर्षांच्या मुलाला देखील अशाच प्रकारे स्पर्ष केल्याचं निष्पन्न झालं आहे. याबाबतही स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आम्ही सर्वाधिक प्राधान्य देतो. या घटनेच्या पार्श्वभुमीवर आम्ही अधिक काळजी घेऊ आणि आमच्या कडे नेमणूक होणाऱ्या स्टाफची पूर्ण तपासणी केली जाईल याची काळजी घेऊ.

राजकीय पक्षांची आंदोलनं

या प्रकारानंतर विविध राजकीय पक्षांनी पोलीस स्थानक आणि शाळा परिसरात आंदोलनं करत कारवाईची मागणी केली.

विविध पक्षांतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनानंतर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे प्रदीप देशमुख यांनी शाळेत अनेक त्रुटी असल्याचा दावा केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळेतील सर्वच मुलांचे समुपदेशन केले जावे अशी मागणी करत ते म्हणाले, “आम्ही विविध पक्षांचे पदाधिकारी पालक, शाळा प्रशासन आणि पोलिस आणि संस्थाचालकांना भेटलो. त्यानंतर शाळेत अनेक त्रुटी असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे.

या संस्थेच्या परिसरात आवश्यक संख्येने सीसीटिव्ही कॅमेरे नाहीत. पालकांनी याबाबत मागणी केली आहे. तसंच पालक शिक्षक संघाची बैठकही होत नाही अशी तक्रार आहे. या मागण्यांची दखल घेत संस्थेने कार्यवाही केली नाही तर आम्ही आंदोलन करु.”

‘गुड टच, बॅड टच’ म्हणजे काय?

मुलांचे लैंगिक शोषण दोन प्रकारे होऊ शकते. पहिलं म्हणजे अर्थातच नकोसा स्पर्श करणे किंवा लैंगिक संबंध प्रस्थापित करणे. तर दुसरा प्रकार असतो ते म्हणजे मुलांना पॉर्नोग्राफिक कंटेट दाखवणे किंवा असे संवाद ऐकायला लावणे.

हे प्रकार होऊ नयेत किंवा असं होणं योग्य नाही यासाठीच मुलांना ‘गुड टच, बॅड टच’चे ट्रेनिंग लहानपणापासून दिले जाते. हे शाळेतल्या संवादातून किंवा पालकांकडूनही दिले जाऊ शकते.

कोणते आणि कोणाचे स्पर्श चांगले आणि हवेसे आणि कुठे स्पर्श करणं योग्य नाही याची माहिती मुलांना देणे म्हणजे ‘गुड टच, बॅड टच’चं शिक्षण.

लैंगिक किंवा शारिरिक अत्याचाराचे प्रकार मुलांसोबत घडू शकतात. मात्र याबाबत पालकांशी कसं बोलायचं याची भीती अनेकदा मुलांच्या मनामध्ये असते.

यासाठीच हे ‘गुड टच, बॅड टच’ची माहिती मुलांना असणं महत्वाचं ठरतं. अनेकदा पालकांनाही या विषयांवर मुलांशी संवाद कसा साधायचा ते कळत नाही.

याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना जिज्ञासा कन्सल्टिंगच्या अनुजा कुलकर्णी सांगतात, “मुलांबरोबरच्या विसंवादामुळे किंवा पालक काय म्हणतील अशी भीती वाटल्यामुळे अनेकदा लैंगिक छळ किंवा अयोग्य स्पर्शासंदर्भातील प्रश्न कित्येक मुलं घरी सांगत नाहीत.”

मुलांचा लैंगिक छळ झाला असेल तर ते ओळखण्याची लक्षणं कोणती?

  • मुलांनी अचानक शांत होणं
  • संवादात खेळण्यात हसणं खिदळणं थांबणं किंवा कमी होणं
  • काही गोष्टी, प्रसंग किंवा व्यक्ती टाळण्याचा प्रयत्न करणं
  • याबाबतचे प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करणं
  • आईवडिलांनी जवळ घेतल्यावर मुलांना अस्वस्थ वाटणं
  • आहार झोप, अभ्यास यावर जाणवेल इतका परिणाम दिसणं
  • तू बरोबर आहेस ना? तिथे अजून कोण असणार? किंवा नाही आलं तर चालेल का असे प्रश्न सतत विचारणं.
  • अशी लक्षणं दिसली तर त्यानंतर बोलणे आवश्यक आहे.

फोटो स्रोत, Getty Images

कुलकर्णी सांगतात, “मुलांशी दैनंदिन सुसंवाद महत्वाचा आहे. मुलांशी जेवताना किंवा झोपण्यापूर्वी त्यांचा दिवस कसा होता याबाबत बोला. त्यांचं म्हणणं लक्ष देऊन ऐका. मार्क का मिळाले नाहीत किंवा डबा का खाल्ला नाही असे टोचणारे प्रश्न विचारू नका. “

“मुलांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना गप्प करण्याऐवजी थोड्या वेळाने बोलुया असं सांगत आपण संवादासाठी उपलब्ध असल्याचं समजणं गरजेचं आहे. तसंच छान वाटणारा म्हणजे ‘गुड टच’ म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून मिळणारं प्रेम, भावनेतली उब जाणवते हे स्पष्ट करू उदाहरणांमधून सांगा. आणि ‘बॅड टच’ म्हणजे अप्रिय स्पर्श म्हणजे ज्याबद्दल घृणा किंवा राग वाटेल म्हणजे मारणं, कपड्यांच्या आत हात घालणं हे योग्य नसल्याचं समजावून सांगा.”

शाळेत बोललं गेलं तरी आपण पालक म्हणून बोलणं गरजेचं आहे. कठीण प्रसंगी काय करायचं हे देखील मुलांना माहित असावं.

तसंच पालकांचा फोन नंबर पाठ असणं आणि गर्दीत सुरक्षित माणसं शोधून कसं बोलावं याकडे लक्ष द्या. गरज भासली तर शिक्षक आणि समुपदेशकांची मदत घेतली जाणं आवश्यक आहे, असंही त्या म्हणाल्या.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

Source link

Exit mobile version