अहिल्यानगरमध्ये लावणी नृत्य व तमाशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन – Dainik Lokmanthan

अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने अहिल्यानगर येथे दि. १५ ते २५ मार्च या क

अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने अहिल्यानगर येथे दि. १५ ते २५ मार्च या कालावधीत १० दिवसीय लावणी नृत्य व तमाशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.
अहिल्यानगर येथील श्रमिक भवन, नवीन टिळक रोड येथे दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे शिबिर होणार असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी व सुपे येथील कालिका कला केंद्राच्या संचालिका राजश्री काळे नगरकर व आरती काळे नगरकर या लावणी नृत्य प्रशिक्षण शिबिरासाठी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर राज्यातील प्रसिद्ध लावणी नृत्य अभ्यासक, वादक, गायक, गायिका देखील या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. १६ ते २५ वर्ष वयोगटातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच हौशी लावणी नृत्य कलावंत या शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ यांनी केले आहे.
शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या शिबिरार्थींना चहा, नाश्ता, जेवण व निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या शिबिरासाठी कुठलीही नोंदणी फी किंवा शुल्क नाही. हे शिबिर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सर्वांसाठी खुले आहे. मात्र शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी इच्छुक शिबिरार्थींनी आपली नावे शिबिर समन्वयक तथा लोककला अभ्यासक भगवान राऊत भ्रमणध्वनी क्रमांक 9822844080 या क्रमांकावर नोंदवावीत.

Source link