अश्लील नृत्य करणे भोवले, 3 कलाकारांवर थेट आजीवन बंदी, पाकमधील ‘या’ प्रांताच्या सरकारने घेतला निर्णय
लाहोर – अश्लील नृत्य केल्याबद्दल पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या सरकारने ३ नृत्य कलाकारांवर आजीवन बंदी घातली आहे. खुषबू खान, निदा चौधरी आणि आप्रिन खान अशी बंदी घालण्यात आलेल्या नृत्यांगनांची नावे आहेत. लाहोरमध्ये अलिकडेच झालेल्या कार्यक्रमात या तिघींनी अश्लील आणि भीबत्स नृत्य सादर केल्यामुळे त्यांच्यावर ही आजीवन बंदी घालण्यात आली असल्याचे सरकारी अधिसूचनेमध्ये म्हटले आहे.
तीन नृत्यांगनांबरोबर त्यांच्या पथकातील अभिनेत्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय सर्व थिएटरनी नियमांचे पालन करावे, अन्यथा मनोरंजक कार्यक्रमांशी संबंधित परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा देखील पंजाब सरकारने दिला आहे.
पंजाब प्रांताच्या सरकारच्या कथित अश्लीलताविरोधी नियमांखाली आपल्यावर विनाकारण बंदी घालण्यात आली असल्याचे तिन्ही नृत्य कलाकारांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जेंव्हापासून मरियम शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले आहे, तेंव्हापासून व्यवसायिक थिएटरवरील नियम अधिकच जाचक करण्यात आले आहेत. अश्लीलता विरोधी कार्यक्रमांवरील कारवाईला वेग आला आहे. अलिकडेच प्रशासनाने नृत्य कलाकार, विशेषतः नृत्यांगनांवर अश्लील नृत्य करणे हे अनैतिक असल्याचे सांगून आजीवन बंदीची कारवाई केली आहे. गेल्या वर्षी पंजाब सरकारने १८७६ च्या ड्रामा पर्फोर्मन्स ऍक्टमध्ये दुरुस्ती केली आहे. या विषयाला आता माहीती आणि सांस्कृतिक विभागाऐवजी गृह मंत्रालयाच्या अख्त्यारित आणण्यात आले आहे. मरियम नवाझ या पंजाबच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत.