Folk music, dance and comedy mesmerized the audience. On the occasion of Gudi Padwa, a cultural program was performed by the Rasik Group, which received enthusiastic applause from the audience. | लोकसंगीत, नृत्य अन् विनोदी प्रहसाने रसिक मंत्रमुग्ध: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रसिक ग्रुपच्या वतीने रंगला सांस्कृतिक कार्यक्रम, प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद - Ahmednagar News
भक्तीगीत, अभंग, गवळण, चित्रपटगीत, लोकगीत, रॉक साँग, नृत्य अन् विनोदाचा तडका अशा चढत्या क्रमाने यंदाचा रसिकोत्सव कार्यक्रम हजारो रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने रंगला. रसिक ग्रुपच्या वतीने सावेडीतील जॉगिंग पार्क मैदानावर वैभवशाली अहिल्यानगरची सांस्कृतिक
.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आ. संग्राम जगताप, मनपा आयुक्त यशवंत डांगे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, पारस उद्योग समूहाचे पेमराज बोथरा यांच्यासह आशिष पोखरणा, अनिल पोखरणा, अश्विन गांधी, श्वेता गांधी, राजेश भंडारी आदी यावेळी उपस्थित होते. पार्श्वगायिका अबोली गिऱ्हे हिने सादर केलेल्या ‘बाप्पा मोरया रे’ या गीताने रसिकोत्सवास प्रारंभ झाला. नंतर नटरंग या चित्रपटातील गाजलेली ‘कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी’ ही गवळण तिने सादर केली. त्या पाठोपाठ चेतन लोखंडे यांनी प्रभू श्रीरामाचे गुणगान गाणारे ‘श्रीराम जानकी बैठे है मेरे सीने मे’ हे गीत सादर केले. मंगेश बोरगावकर, जुईली जोगळेकर यांनी बहारदार गीते सादर केली. धनश्री काडगावकर आणि सहकाऱ्यांनी ‘चंद्रा’ ही लावणी, ‘आवाज वाढव डीजे तुला’ या गाण्यांवर नृत्य सादर केले. राधा खुडे हिने हलगी वाजते, पाटलाचा बैलगाडा, पाव्हणं जेवला का ही लोकसंगीतावर आधारित गाणी सादर केली. अभिनेता कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी यांनी हवालदार आणि फिर्यादी बनवून विविध उखाणे घेत धमाल उडवून दिली. त्याचबरोबर खोडकर विद्यार्थी आणि त्याची परीक्षा घेणारी कडक शिक्षिका अशा दोन विनोदी नाटिका सादर करून हास्याची कारंजी फुलवली. गायकांना ट्रम आणि ढोलकीवर नितीन शिंदे, ढोलकीवर नागेश भोसेकर, ऑक्टोपॅडवर श्रीकांत गडकरी, कीबोर्डवर निनाद सोलापूरकर व सुनील जाधव, तर गिटारवर किरीट मांडवगणे यांनी सुरेल संगीत साथ दिली. रसिक ग्रुपच्या परंपरेनुसार कार्यक्रम स्थळी प्रवेश करतानाच हातात मोगऱ्याचा गजरा आणि अत्तराचा फाया लावून रसिक प्रेक्षकांचे स्वागत केले जात होते. रंगमचाशेजारी रसिकोत्सवची आकर्षक रांगोळी लक्ष वेधून घेत होती. आकाशात रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी, रंगीबेरंगी रिबन शॉट्स आणि कोल्ड फायरचा वापर, नेत्रदीपक विद्युत रोषणाई व सुस्पष्ट ध्वनी क्षेपणामुळे अविट गोडीच्या गाण्यांचा आस्वाद रसिक प्रेक्षकांनी घेतला. मिलिंद कुलकर्णी आणि प्रसाद बेडेकर यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.